स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना ‘संस्कार भारती’तर्फे कलेद्वारे अभिवादन

प्रदर्शन पी.एन्. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे रविवारपर्यंत (ता. २७) खुले

पिंपरी-चिंचवड, २३ नोव्हेंबर २०२२ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्प हस्तकला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना आपल्या कलेद्वारे अभिवादन करण्याचे योजिले आहे. प्रत्येक आठवड्यात ४ कलासाधक असे २० आठवड्यांत एकूण ७५ कलासाधक (पिंपरी-चिंचवड परिसरातील) आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करणार आहेत.

‘स्मृतीरंग ७५’ (पुष्प ९) या पिंपरी-चिंचवड परिसरातील ४ कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. २२ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता चित्रकार सौ. सुनीता अमित आचार्य यांच्या शुभहस्ते झाले. ‘संस्कार भारती’च्या ध्येय गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. सर्व सहभागी कलासाधकांनी दीपप्रज्वलन केले. सौ.सुनीता आचार्य यांचे स्वागत समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी केले.
सर्व सहभागी कलाकार सौ. मुग्धा शिरोडकर, श्री. नरेंद्र गंगाखेडकर, सौ. ईशा साठये-मेहंदळे, कु. सोल्डी गुप्ता यांचे सौ. सुनीता आचार्य यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

बघकार्यक्रमाचे उद्घाटक सौ. सुनीता आचार्य यांनी मनोगत व्यक्त करताना, सर्व कलाकारांच्या कामाचे कौतुक केले व कु. सोल्डी गुप्ता या दिव्यांग मुलीच्या कलाकृतींचा समावेश करून तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल ‘संस्कार भारती’च्या चित्रकला विभागाचे विशेष अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे प्रांत साहित्य विधा संघटक सौ. विशाखा कुलकर्णी, चित्रशिल्प हस्तकला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कलासाधक व कलारसिक उपस्थित होते. समितीचे कलासाधक श्री. विनोद गोयर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कलासाधक श्री. रमेश खडबडे यांनी आभार मानले.

‘स्मृतीरंग ७५’ (पुष्प ९) हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. २७ नोव्हेंबर) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी पी. एन्. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे; तसेच रविवारी (ता. २७ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध चित्रकार श्री. रमेश खडबडे यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. तरी सर्व रसिकांनी प्रदर्शनाचा व प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कार भारती चित्रशिल्प हस्तकला विधाप्रमुख प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा