संत बहिणाबाई

संत कृपा झाली इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।

नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार।

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत।

तुका झालासे कळस भजन करा सावकाश।

बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा।।

या प्रसिध्द अभंगाची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई संत तुकाराम महाराजांच्या समकालीन पण पुढच्या पिढीतल्या होत.

संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होउन गेल्या त्या जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, आक्काबाई यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे.

नाव संत बहिणाबाई पाठक
जन्म 1628
मृत्यु 1700
आई जानकी
वडिल आउजी कुलकर्णी
पती रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक
बहिणाबाईंचा जन्म वेळगंगा नदीच्या तिरावर वसलेल्या देवगांव रंगारी या ठिकाणी जानकी आणि आऊजी या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्या काळच्या चालिरीतींप्रमाणे वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी त्यांचा विवाह गावापासुन काही अंतरावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं झाली.

बहिणाबाईंना परमार्थाची आणि भक्तीची गोडी बालपणापासुन होती सत्पुरूषांची सेवा करणे, कथा किर्तनं पुराण यांचे श्रवण करण्यात त्या अगदी रमुन जात. यातुनच पुढे संसारातील गोडी कमी होत जाऊन परमार्थात त्या लीन झाल्या. वारकरी संप्रदायात असल्याने पांडुरंगाप्रती प्रिती मनात होतीच. कोणतही काम करत असतांना भक्तिभावाने सतत नामस्मरण सुरू असे. ज्या सुमारास त्या कोल्हापुर येथे वास्तव्याला होत्या त्यावेळी जयराम स्वामी यांची कथा किर्तनं ऐकुन त्या फार प्रभावित झाल्या. तुकाराम महाराजांचा त्यांनी ध्यास घेतला. कायम तुकाराम महाराजांचे अभंग ओव्या गुणगुणु लागल्या.

बहिणाबाईंना तुकाराम महाराजांची भेट घ्यावयाची त्यांचा अनुग्रह घेउन त्यांना गुरू करण्याची फार ईच्छा होती आणि म्हणुन त्यांनी निरंतर तुकारामांचा ध्यास घेतला क्षणोक्षणी त्यांचे अभंग म्हणु लागल्या परंतु त्यांची भेट होण्यापुर्वीच तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु एके दिवशी बहिणाबाईंच्या स्वप्नांत येऊन त्यांना गुरू उपदेश केला. बहिणाबाईंची त्यांच्यावरची निष्ठा पाहुन तुकोबारायांनी साक्षात स्वप्नातुन त्यांना दृष्टांत दिला. त्या घटनेनंतर बहिणाबाईंचे आयुष्य पुरते बदलुन गेले. प्राप्त झालेल्या गुरूबोधामुळे त्यांचं जीवनच पालटलं. आपल्या अभंगांमधुन बहिणाबाईंनी स्वतःच्या गुरूपरंपरेबद्दल व संत तुकाराम महाराजांबद्दल वर्णन केलं आहे.

तुकोबारायांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या बहिणाबाईंनी हे अभंग असल्यामुळे या अभंगांना फार आगळंवेगळं महत्व आहे. गजानन विजय ग्रंथांची निर्मीती करणारे गेल्या शतकातील संत कवी दासगणु महाराज बहिणाबाईंबद्दल लिहीतांना म्हणतात…

पहा केवढा अधिकार…

ऋणी तिचा परमेश्वर…बहिणाबाई कायम विठुरायाच्या भेटीकरता वारीत जात असत एकदा वारीतुन पंढरीला जात असतांना त्यांना थंडी वाजुन ताप भरला.

पंढरीला जायची ओढ आणि तळमळ इतकी होती की अंगावर घेतलेल्या फाटक्या घोंगडीला त्यांनी विनंती केली ’’मी वारीत जाऊन येईपर्यंत माझी ही हुडहुडी तु तुझ्याजवळ ठेव, मी वारीतुन परत आल्यानंतर माझ्या नशीबाचा भोग भोगेल’’ ती घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली आणि त्या वारीला गेल्या.वारी करून सुखरूप परत येईपर्यंत ते झाड थंडी ने कुडकुडत थरथर हलत होते…. केवढी ती श्रध्दा आणि केवढा तो बहिणाबाईंचा भक्तिभाव….

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा