संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विठाई रथावर वाल्हेत फुलांची तर जेजुरीत भंडाऱ्याची उधळण

6

जेजुरी, दि. ३ जुलै २०२०: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काल सायंकाळी पंढरपुरातील आषाढीवारी आटोपून एसटी(विठाई) बसने आळंदी कडे परतले . परतीच्या वाटेवर पुरंदर तालुक्यामध्ये या सोहळ्याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. वाल्हेत फुले तर जेजुरीत भंडारा उधळण्यात आला. जेजुरी मधील भंडारा उधळण्याचे दृश्य अनेकांना मोहवून टाकणारे असे होते.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. माऊलींच्या पादुका एस टी बस मधून पंढरपूर मध्ये नेण्यात आल्या. आषाढी एकादशी नंतर आज हा सोहळा बस मधून पुन्हा आळंदीकडे रवाना झाला. या सोहळ्याचे स्वागत पुरंदर तालुक्यातील रस्त्यालगतच्या गावातून लोकांनी दुतर्फा उभे राहून स्वागत केले.

अनेक ठिकाणी लोक सामाजिक अंतर राखत माउलींच्या रथाला नमस्कार करताना दिसून येत होते. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे या रथावर वाल्हेकरांनी पुष्पवृष्टी केली. तर जेजुरीकरांनी भंडारा खोबरे उधळून या रथाच स्वागत केले. यावर्षी सासवड,वाल्हे आणि जेजुरी या गावात माऊलीचा मुक्काम होऊ शकला नाही. त्यामुळे या गावातील लोकांच्या मनामध्ये मोठी हुरहूर होती.

वाल्हेकरांनी परतीच्या प्रवासाला निघालेल्या माउलींच्या विठाई रथावर फुले उधळून आपली माऊलींप्रती असलेले भक्ती भावना व्यक्त केली. तर जेजुरीत दरवर्षी माऊलींच्या रथावर मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण्याची परंपरा आहे. जेजुरी मध्ये दरवर्षी शिव वैष्णवांची भेट होत असते. विठुरायाच्या दर्शनाला निघालेले वारकरी शिवअवतार असलेल्या खंडोबाचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेत असतात. मात्र यावर्षी शिव वैष्णवांची भेट झाली नाही आणि जेजुरीकरांना भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचे स्वागत ही करता आलं नाही.

यावेळी माऊलींच्या पादुका विठाई रथातुन आळंदीकडे जात असताना जेजुरीकरांनी रथावर भंडारा उधळून माऊलींचे स्वागत केले व आपला भक्तिभाव प्रगट केला. जेजुरीतील निवडक नागरिक यावेळी सोशल डिस्टन्स पाळत व तोंडाला मास्क लावून माऊलींचे स्वागत सोहळ्यात सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा