संवादाचे “क्रांती”वीर नाना पाटेकर

नाना पाटेकर नाट्य, मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीतील एक प्रतिष्ठित नाव. ज्यांच्या भारदस्त संवाद फेक आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक नाटक, चित्रपट त्यांनी दिले. आशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज वाढ दिवस. जाणून घेऊ त्यांच्याविषयी थोडस….

नाना पाटेकर यांचा जन्म १जानेवारी १९५१ मध्ये  मुरुड-जंजिरा येथे झाला. त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये विद्यार्थी दशेत शिक्षण घेतले. नानांना स्केचेस बनवण्याचा अत्यंत नाद होता. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.

त्यांनी  हिंदी व मराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे.
नाना पाटेकर यांच्या आयुष्याचा जीवन प्रवास तसा खूप खस्ता खाऊनच पुढे आला. परंतु त्यातून खचून न जाता मोठ्या धडपडीतून शिकून हा एक अभिनेता म्हणून उभा राहिला. जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे.
नाना पाटेकर यांनी१९७८मध्ये ‘गमन’ या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. त्यानंतर पुढे आठ वर्षे नाना हे चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.
राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले. परंतु पण चित्रपट पडला.

परंतु नाना पाटेकर यांची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला १९८६ साली प्रदर्शित झालेला “अंकुश” हा चित्रपट. या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर नानांनी मागे वळून पहिलेच नाही.
१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.
१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.
त्यानंतर २०१४ मधील ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. क्रांतिवीर, वजुद, वेलकम, वेलकम बॅक, टॅक्सी नं 9211, कोहराम यांसारख्या लोकप्रिय चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारल्या.

याशिवाय त्यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.

याशिवाय नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यात पाऊल ठेवत सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर “नाम फाउंडेशन” या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.

अशा या अष्टपैलू अभिनेत्याला “न्युज अनकट” कडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा