‘सरल’ आणि ‘यू-डायस’ एकत्रीकरण शिक्षकांना मोठा दिलासा, अध्यापनाला मिळणार अधिक वेळ!

अखेर राज्यातील शिक्षकांना माहिती भरण्याच्या दुहेरी त्रासातून कायमची सुटका मिळणार आहे! महाराष्ट्र शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘सरल’ (SARAL) आणि ‘यू-डायस प्लस – UDISE+) या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक माहिती प्रणालींचे एकत्रीकरण (Integration) करण्याचे काम सुरू केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिक्षकांचा बहुमूल्य वेळ वाचणार असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या अध्यापन आणि शैक्षणिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत शिक्षकांना विद्यार्थी संख्या, उपस्थिती (हजेरी), शाळेची आकडेवारी आणि शैक्षणिक प्रगती यांसारखी अनेकदा तीच माहिती दोन वेगवेगळ्या पोर्टल्सवर स्वतंत्रपणे भरावी लागत होती. यामुळे शिक्षकांचा बराच वेळ अनावश्यक कामांमध्ये वाया जात होता. परिणामी, त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.

शिक्षण विभागाने ही गंभीर अडचण लक्षात घेतली. प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांच्या म्हणण्यानुसार, आता संचमान्यतेसह (Sanctioned Strength) इतर बाबींसाठी केवळ यू-डायस प्लस (UDISE+) मध्ये माहिती भरल्यानंतर ती आपोआप सरल पोर्टलमध्ये परावर्तित (Reflected) होणार आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.

हे एकत्रीकरण शिक्षण व्यवस्थेमध्ये गतिमानता आणणार आहे. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले, “सरल प्रणाली आता सरळ होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अध्यापनासाठी, संस्कार उपक्रमासाठी आणि सरकारच्या अन्य उपक्रमांसाठी वेळ मिळेल.”

या बदलामुळे शिक्षकांना केवळ माहिती भरण्याच्या कामातून सुटका मिळणार नाही, तर शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय गाठण्यास मदत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे