राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार!

मुंबई, दि. २४ मे २०२० : सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण देशभरात झाली असून कोरोनाबाधित
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झालेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संशयित रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभुमीवर कोविड -१९ रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच कोविड -१९ महामारीच्या संकटामध्ये
सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले
जन आरोग्य योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढवण्यात आली आहे.

▫️कोणते निर्णय घेतले आहेत

१). कोविड -१९ उद्रेकाच्या पार्श्वभुमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता लाभार्थी रुग्णांबरोबर राज्यातील सदर योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-१९ साठी उपचार अनुज्ञेय राहील. याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहीत कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी. (लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणन वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदार यांचा
दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल, त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांर्भीय, उपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्राबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांना देण्यात येत आहेत. )

२). सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील २.२३ कोटी कुटुंबांना मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५% लोकसंख्येचा समावेश होतो. तथापि राज्यातील कोविड-१९ उद्रेकाची सद्यस्थिती पाहता सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या उर्वरीत
नागरिकांना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

३). शासकीय रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांना ३१ जुलै, २०२० पर्यंत मान्यता प्राप्त दराने देण्यात यावेत.

४). काही किरकोळ व काही मोठे उपचार व काही तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन
आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत. त्या उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना (योजनेंतर्गत लाभार्थी असलेले व लाभार्थी नसलेले) CGHS च्या दरानुसार (NABH/NABL) उपलब्ध करून देण्यात येतील. सदर खर्चाची प्रतीपुर्ती संबंधित रुग्णालयास
राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांचेमार्फत हमी तत्वावर करण्यात येईल.

५). कोविड -१९ साठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरीता PPE किट्स व N-९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य
चिकित्सक यांची राहील. तसेच प्रतीपुर्ती करण्यापुर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांची राहिल.

६). सदर योजना ३१ जुलै, २०२० पर्यंत अंमलात राहील. तद्नंतर याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा