अहमदनगर: पत्नीच्या माता-पित्यांना मारहाण करणाऱ्या जावयासह चौघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
पावलस कचरू गायकवाड (रा. खरवंडी कासार,), संजय छबू हिवाळे (रा.चेंबूर, वाशिनाका मुंबई), पेतरस कचरू गायकवाड व योहान कचरू गायकवाड (रा. खरवंडी कासार ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत.
पारनेर तालुक्यातील रहिवासी वृषाली किसन ठुबे हिचा १३ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपी पावलस कचरू गायकवाड याच्यासोबत विवाह झाला होता.
पावलस व इतर तिघा आरोपींनी ३ डिसेंबर २०१४ रोजी वृषाली हिच्या घरी जाऊन तिच्या चुलत भावास धक्काबुक्की करत त्याला घरात कोंडून टाकले. यावेळी वृषालीचे आई-वडील किसन विष्णू ठुबे व मंदा ठुबे यांना मारहाण केली़.
वृषाली हिचा चुलत भाऊ भानुदास विठ्ठल ठुबे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश ए.एम़.शेटे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़. पुष्पा गायकवाड यांनी काम पाहिले.