सासवड जवळील हिट ट्रान्सफर कंपनीला मालकाने लावले टाळे

सासवड : सासवड ( ता. पुरंदर ) येथील सासवड हिट ट्रान्सफर अँड इंजिनिअरिंग प्रा. ली. हि कंपनी सोमवारी व्यवस्थापनाने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे कर्मचारी नियमित वेळेवर कामावर गेले असता कंपनीला टाळे लावून कंपनी बंद केल्याची नोटीस लावल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गात एकच असंतोष उफाळून आला असून कंपनीतील सुमारे ५२ कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नात त्वरित लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे या कंपनीत गेल्या काही दिवसांपासून कामगारांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. १०० च्या जवळपास कामगार असताना ४५ ते ५० कामगारांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. तर उर्वरित कामगारांनी प्रशासनाशी लढा सुरु केला आहे. २६ डिसेंबर पर्यंत कामगार नियमित काम करीत असताना रात्री अचानक नोटीस लावण्यात आली. १३ डिसेंबर पासून कंपनी बंद असल्याचे त्यावर लिहिले आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, येथील कंपनी बंद करून वाराणशी येथे कंपनी सुरु केल्याचे सांगितले आहे तर कामगारांनी वाराणशी येथील कंपनीच्या युनिटमध्ये येवून काम करावे अशी सक्त ताकीद करण्यात आली आहे. वास्तविक पाहता कंपनीचे कामगार सरासरी ४५ ते ५० वयोगटाच्या पुढील असून त्यांना मिळणारे मानधन त्यामानाने खूप कमी आहे. सर्व कामगार कायम असताना त्यांना नियमाप्रमाणे वेतन आणि सुविधा दिल्या जात नाहीत अशा तक्रारी कामगारांनी केल्या आहेत.
याबाबत कंपनीचे व्यवस्थापक चोभे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कामगारांना वाराणशी येथे काम करणे शक्य नसेल तर त्यांनी घरी बसावे, त्यांचा निर्णय न्यायालयातच होईल, तसेच आम्हाला त्रास झाल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.
कंपनीतील कामगार चंद्रकांत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, मी या कंपनीत सुमारे तीस वर्षे काम करीत असून वय ५६ एवढे आहे. मला दोन मुले असून एकर शेती आहे. त्यामुळे या वयात दुसरी नोकरी कोण देणार ? वाराणशी येथे जावून काम करणे या वयात शक्य आहे का ? असे मनाला भिडणारे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
कंपनीतील इतर कामगारांनीही कंपनीच्या या कृत्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार घेतला आहे. कंपनीतील कामगारांना साधा कंपनीचा ड्रेसही दिला जात नाही. सुमारे चार महिन्यांपासून एकही कामगाराला पगार दिलेला नाही. त्यामुळे प्रथांक महिन्यांचा पगार. सर्व वेतन आणि भविष्यकालीन विचार करून नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असे सांगितले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यानीही कंपनीचे मालक चर्चा करण्यास टाळाटाळ करीत असून कामगारांना धमक्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. तसेच कामगारांनी याबाबत निवेदन दिले असून त्या प्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा