सातारा जिल्हा बँक उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित

11

फलटण, सातारा १५ सप्टेंबर २०२३ :
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई, यांच्या वतीने दिला जाणारा सर्वात उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार हा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रदान करण्यात आला.

सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय सहकार धोरण कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आव्हाड यांच्या हस्ते पुरस्कार सातारा जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे सर, व्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक अजित शिंदे, उद्धव देशमुख, गणेश नलावडे, विभाग प्रमुख रविंद्र उंबरकर, प्रदीप बारटक्के यांनी स्वीकारला.

यावेळी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की, सातारा जिल्हा बँकेच्या यशस्वी वाटचालीचे उत्तम व्यवस्थापन व नियोजनबद्ध कारभार असून जिल्हा बँक ही देशातील उत्तम बँक आहे. अनेक पुरस्कार या बँकेला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सातारा जिल्हा बँकेला उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ विविध सोसायटीचे पदाधिकारी व बँकेचे कर्मचारी यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

सातारा जिल्हा बँकेला उत्कृष्ट बँक पुरस्काराने सलग २१ वेळा पुरस्कृत करण्यात आले आहे. राज्यातील एकमेव जिल्हा बँक या पुरस्काराची मानकरी असून १९९७-१९९८ साला पासून हा पुरस्कार बँकेला मिळत आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्हा बँकेच्या नावलौकिकात भर पडल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार