सातारा जिल्ह्यात नो पास नो एंट्री

पुरंदर, दि. १२ जून २०२०: मुंबईमध्ये वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता मुंबई मधील अनेक चाकरमानी गावाकडे येत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुंबई, पुणेकरांना आता साताऱ्यात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवासाचा ऑनलाईन परवाना अत्यावश्यक असून पास नसणाऱ्या व्यक्तींना सातारच्या सीमेवरून माघारी पाठवले जात आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर नो, पास एन्ट्री या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.

कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात सातारा जिल्हा कोरोनामुक्त होता. शेजारील सर्व जिल्ह्यांमधून कोणाचे रुग्ण आढळून येत असले तरी सातारा मात्र ग्रीन झोन मध्ये होता. मात्र मुंबईहून आलेल्या काही कोरोना बधितांमुळे साताऱ्यात कोरोनाची साथ आली आणि आता ती सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरली आहे. काल संध्याकळपर्यंत साताऱ्यात कोरोनाचे एकूण ७०३ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४४८ रुग्ण बरे झाले आहेत तर २२३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज पर्यंत ३३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने परवानगीशिवाय येऊ नये असा आदेश काढला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक सीमेवरील प्रवेशाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी निरा आणि सारोळा, सांगवी या निरां नदीकाठच्या पुणे सातारा सीमेवर तपासणी करून विनापासधारक प्रवाशांना तिथूनच माघारी पाठवले जात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या गावाकडे जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे विनापास साता-यात जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपले आपल्या कुटुंबाचे हाल करून घेणे असेच होऊन बसले आहे. अनेकांना चेक नाक्यावरूनच पुन्हा माघारी मुंबईकडे जावे लागत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यात येण्यासारखे पुरंदर बारामती मधील काही चोरमार्ग मुंबईकरानी वापरले होते. ते मार्ग ही आता पोलिसांनी बंद केले आहेत.

लॉकडाऊन शिथिल झाला आहे आणि आता कोणालाही कामानिमित्त प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे, असा लोकांचा समज आहे. मुंबईहून सातारा सीमेपर्यंत येईपर्यंत कोणताही आडथळा येत नाही. पुणे जिल्ह्यात सहज प्रवेश मिळतो मात्र सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातारा सीमेवरून माघारी पाठवलेले अनेक जण पुणे जिल्ह्यातील सीमा भागातील गावातून ऑनलाईन पास काढण्यासाठी कॉम्प्युटर सेंटर, महा ई सेवा केंद्र शोधताना आढळून येत आहेत. त्यामुळे या लोकांचा या गावातील लोकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे पुरंदर मधील नीरा पिंपरे या गावांमध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे.

मुंबईहून साता-यामध्ये येणाऱ्या अनेक चाकरमान्यांना आपल्या कुटुंबाची काळजी वाटते आहे. मुंबईमध्ये आपले कुटुंब सुरक्षित नाही असेच त्यांना वाटते आहे आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाला गावाकडे सोडून पुन्हा नोकरीला जाण्याचा निर्धाराने अनेक जण गावाकडे येत आहेत. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांना आडवले जात असल्यामुळे त्यांची मोठी निराशा होत आहे.

दरम्यान लोकांनीआपली गैरसोय होऊ नये म्हणून शासनाचा योग्य तो परवाना घेऊनच सातारा जिल्ह्यात यावे. विनापरवानाधारक कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना नीरा नाजिक पाडेगाव चेक नाक्यावरून माघारी पाठवले जाईल. असे लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा