उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी सत्तारांची टीका

औरंगाबाद, २३ ऑक्टोंबर २०२२ : ‘शिवसेना पक्ष प्रमुख अध्यक्ष उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते दौऱ्यावर आले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच शिंदे गटाचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की २४ मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील.

याशिवाय मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. कमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे. २२-२४ मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील.

तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सायंकाळी औरंगाबाद येथील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. तर त्या व्हायरल झालेल्या कुटुंबाला अनेकांनी मदतीचा हात दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्या कुटुंबाला आधार दिला होता. त्यानंतर आता आज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. “उद्धव ठाकरेंच्या सात मिनिटाच्या दौऱ्याचा उल्लेख सामन्यात छापून आला होता पण आता त्यांच्या आजच्या दौऱ्याबाबत उद्याच्या सामनामध्ये काय छापून येतंय ते मी आवर्जून वाचणार आहे” असा टोला सत्तारांनी लगावला आहे.

दरम्यान सत्तारांच्या याच टीकेला ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे. तुम्ही ५० खोके आमदारांना देता. मग शेतकऱ्यांना एखादी पेटीतरी द्या. शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. सगळे आपापल्या धुंदीत आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत, अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा