सावित्रीबाई फुले महान समाजसेविका- हर्षवर्धन पाटील

इंदापूर दि.३ जानेवारी २०२१ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्ताने व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी प्रा. स्नेहा गायकवाड यांचे’ माय सावित्री समजून घेताना’ याविषयावर व्याख्यान झाले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ स्त्री शिक्षणाचा पहिला संदेश सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून या देशात निर्माण झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ झाला. आज आपण त्यांची १९० वी जयंती साजरी करीत आहोत आज देखील त्यांचे नाव प्रत्येक घराघरांमध्ये विशेषता महिलांमध्ये आदराने घेतले जाते. स्त्रियांना समाजात पुढे नेहण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून झाले आहे.त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केले. त्या काळातील  प्लेग साथीमध्ये स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे नेत असताना तसेच समाजसेवा करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. महान समाजसेविका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करावा लागेल.’
स्नेहा गायकवाड म्हणाल्या की,’ सावित्रीबाई फुले यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण सर्वजण प्रतिभावंत होऊ शकतो हा आत्मविश्वास आपल्याला वाटतो. निस्वार्थी समाजसेविका म्हणून सावित्रीबाई फुले आपणास आदर्शवत आहेत. आपण आदर्श कोणाला मानतो यावर आपली वाटचाल अवलंबून असते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य तसेच त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगून त्यांच्या आचार विचारा प्रमाणे आपण वाटचाल केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.’
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, संस्थेचे खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संचालक विलास वाघमोडे, गणपत भोंग उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य प्रत्यक्ष आचरणात आणावे याविषयीची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार प्रा. रोहिदास भांगे यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा