पुणे, २६ ऑक्टोबर २०२०: राज्यातील व्यस्त विद्यापीठांपैकी एक म्हणजे पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ. विद्यापीठाच्या परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी किंवा ऍडमिशन साठी तसेच परीक्षांचे हॉल तिकीट याबाबत सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नेहमीच समस्यांचा सामना करावा लागला आहे. कित्येकदा विद्यार्थ्यांच्या विषयांमध्ये देखील बदल झालेला बघण्यास मिळाला आहे. अलीकडच्या काळात विद्यापीठानं आपलं बरंच काम काज ऑनलाइन पद्धतीनं सुरू केला आहे. त्यामुळं हे घोळ जास्तच वाढले आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडं अनेक तक्रारी केल्या परंतु, त्याचं निवारण झाल्याचं दिसेना.
काही दिवसांपूर्वीच सर्व्हर डाऊन झाल्यामुळं अगदी रात्री अकरापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागल्या होत्या. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत १३ हजारापेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आलं आहे.
विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थांची परीक्षा घेतली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही परीक्षा सुरु आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक गुगल फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणींची विद्यापीठ प्रशासनाकडं नोंद करता येत आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातील अडचणीच्या १३ हजारापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्यानं ऑनलाईन परीक्षेचा कसा फज्जा उडाला हेच पाहायला मिळतं. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचं विभाजन करुन त्यावर निर्णय घेण्यात काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात येत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे