सयाजी शिंदेंचा मुळा नदीसाठी टाहो;’माझ्या नदीला कॅन्सर, प्रशासनाला नाही सेन्सर!

16
Sayaji Shinde on Mula River pollution
माझ्या नदीला कॅन्सर, प्रशासनाला नाही सेन्सर

Sayaji Shinde on Mula River pollution: आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या मनात घर करणारे अभिनेते सयाजी शिंदे आता एका वेगळ्या भूमिकेत समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असलेल्या मुळा नदीच्या दुर्दशेने ते व्यथित झाले आहेत. नदीच्या सिमेंटीकरणामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘माझ्या नदीला कॅन्सर झाला आहे आणि प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नाही,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

पिंपळे निलख भागातील मुळा नदीच्या परिसराला भेट देऊन सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. नदीकाठच्या परिसरातील वृक्षतोड आणि सिमेंटीकरण पाहून ते अत्यंत दुःखी झाले. नदीकिनारी वर्षभर बहरणाऱ्या करंजाच्या झाडांचे उदाहरण देत ते म्हणाले, “इथे माझ्या पाचशे नातेवाईकांसारखी करंजाची झाडं होती. प्रशासनाने विकासाच्या नावाखाली त्यांच्या घरावर बॉम्ब टाकला.”मुळा नदी आज गटारगंगा बनली आहे, याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “लोकांनी लोकप्रतिनिधींना यासाठीच निवडले आहे का, की त्यांनी नदीकाठाची वाट लावावी? नदीकाठ जपण्याची गरज आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले. विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘माझ्या नदीला झालाय कॅन्सर, सगळ्यांचा उडाला सेन्सर’ ही मार्मिक कविता सादर करत सयाजी शिंदे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर टीका केली. “झाडे ही नदीची गरज आहे. नदीपात्रात दूषित पाणी येऊ नये याची काळजी घेण्याऐवजी हे बांधकाम कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जैवविविधता, झाडे, पक्षी आणि जलचर यांचे अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचे काम प्रशासन करत आहे, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. सयाजी शिंदेंच्या या भावनिक आवाहनाला आता पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नागरिक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे