नागपुरात शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावा संपन्न

नागपूर, २२ फेब्रुवारी २०२४ : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या नवचेतना उपक्रमा अंतर्गत काल रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, बाल कल्याण विभागाचे श्री मुश्ताक पठाण, मनपा बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल, मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक कार्यक्रम अधिकारी श्री. धनलाल चौलीवार, आकांक्षा फाउंडेशनच्या श्रीमती जयश्री ओबेरॉय, मनपा शाळेचे माजी विद्यार्थी श्री. झाकीर हुसेन, आयएपीएच्या श्रीमती अमरजा खेडीकर यांच्यासह इतर पालक, शिक्षक, विद्यार्थी व मनपा कर्मचारी उपस्थित होते.   

मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर क्षेत्राचेही ज्ञान देऊन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होतो. या मौलिक कार्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक रहावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

मनपा शाळेतील शाळा समिती सदस्य व पालकांना शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, मनपा शाळेचे अमूल्य कार्य,  मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच शालेय विद्यार्थांना दिले जाणारे शालेय साहित्य, शिक्षणाचे महत्व, पालकांची त्यांच्या पाल्याविषयीची जागरूकता व पालकांचा शालेय कार्यकालप सहभाग या सर्व विषयांवर अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मार्गदर्शन केले. 

मनपाच्या  प्रत्येक शाळेत सुपर-७५, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ असे उपक्रम शाळेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी घेतले जातात. शिक्षकांनी येणाऱ्या नवीन सत्रात दर महिन्यात एक पालकसभा घ्यावी जेणेकरून शिक्षक आणि पालक यांच्यात एक नाते प्रस्थापित होईल व मुलांच्या प्रगतीविषयी देखील माहिती मिळेल, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शिक्षण विभागाला दिले.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, पालकांनी त्यांच्या पाल्याविषयी जागरूक राहावे. तसेच शाळेत जाऊन शिक्षकांना पाल्याच्या प्रगतीविषयी विचारणा करावी व आपल्या मुलामुलींना नीट समजून घ्यावे.

नवीन शैक्षणिक धोरणात मनपा शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या अंगणवाड्यांना मनपा शाळेत जागा देण्यात येणार असून  मनपा शाळेत बालवाडी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवचेतना उपक्रमा अंतर्गत मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळेच्या विकासासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात आढळलेल्या त्रुटींचे एक रिपोर्टकार्ड बनविण्यात आले असून ते मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मुख्याध्यापकांना दिले. या त्रुटी भरून काढण्यासाठी व शाळा अत्याधुनिक बनविण्यासाठी मनपा सतत प्रयत्नशील आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रात मनपा शाळेच्या भौतिक विकासात चांगलीच प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून दिले. सकाळी लवकर उठण्याचे  फायदे, किशोरावस्थेतील लसीकरण आदींची माहिती दिली. लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे दुष्परिणाम देखील त्यांनी उदाहरणासह विषद केले. शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी शाळेत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, मनपाकडून विद्यार्थांना मिळणारे शालेय साहित्य, पोषण आहार याविषयी माहिती दिली. मनपा बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल यांनी दैनंदिन जीवनात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, त्यांना पोषक आहार देण्याचे आवाहन केले. मनपा शाळेचे माजी विद्यार्थी श्री. झाकीर हुसेन यांनी स्वतःचे शालेय अनुभव सांगितले. श्री. झाकीर हुसेन हे  एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून मिळविलेले यश याबाबत माहिती दिली. आयएपीएच्या अमरजा खेडीकर यांनी पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. यात त्यांनी ‘गुड टच’, ‘बॅड टच’, मुलांचे अधिकार व कायदे समजावून सांगितले. सहायक  कार्यक्रम अधिकारी श्री. धनलाल चौलीवार यांनी मनपा शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य सर्वांसमोर मांडले. जी. एम. बनातवाला शाळेची विद्यार्थिनी इफ्रा हिने इंग्रजी भाषेत मनपा कार्याविषयी उत्तम माहिती दिली. तर कार्यक्रमाचे संचालन मनपा शाळेची विद्यार्थीनी श्वेता हिने केले.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा