नवी दिल्ली, 29 जानेवारी 2022: देशभरात 15 वर्षांखालील मुलांसाठी कोविड-19 लसीकरण मोहिमेची गती वाढत असताना, केंद्र सरकार लवकरच देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी एडवाइजरी जारी करू शकते. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सूत्रांनी सांगितलं की केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाला देशभरात शाळा उघडण्याच्या पद्धती सुचवण्यास आणि तयार करण्यास सांगितलंय.
सूत्रांनी सांगितलं की, “कोविड-19 मुळे सर्व वयोगटातील मुलांवर परिणाम झाला आहे. तथापि, मुलांमधील मृत्यूचं प्रमाण आणि रोगाची तीव्रता नगण्य आहे. आरोग्य तज्ञांचं मत आहे की मुलांनी शाळेत परत जाण्याची वेळ आली आहे.” कोविड-19 साथीच्या आजाराचा प्रसार झाल्यापासून शाळा बंद आहेत. काही राज्यांनी मध्यंतरी अंशतः शाळा उघडल्या आहेत, परंतु वर्ग अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले नाहीत.
दुसर्या सूत्राने सांगितलं की, ते शाळा उघडण्यास तयार आहेत की नाही हे राज्यांनी ठरवावं. सर्वोच्च सूत्रांनी एजन्सीला असंही सांगितलं आहे की केंद्र कोविड-19 प्रोटोकॉलचं काटेकोर पालन करून शाळा पुन्हा उघडू इच्छित आहे. 16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आणि 01 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र लोकसंख्येचं लसीकरण सुरू झाले.
लसीकरणाचा पुढील टप्पा 03 जानेवारीपासून 15 वर्षे वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, ऐतिहासिक कामगिरीमध्ये, देशातील 95 टक्के पात्र लोकसंख्येला कोविड-19 लसीचा पहिला डोस मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर लवकरच मुलं शाळेत परत येऊ शकतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे