आज पासून सुरू होणार शाळा, पण अनेक राज्य बंद ठेवणार शाळा

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: अनलॉक ४ मध्ये बरीच सवलत व सुविधा मिळाल्यानंतर काही राज्यांनी सोमवारी नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, अद्याप अनेक राज्ये सहमत नाहीत. राज्य आणि पालक म्हणतात की कोरोना संक्रमणाचा परिणाम पाहता मुलांना शाळेत पाठविणं धोक्याचं आहे. सोमवारपासून मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा यांनी कोविड -१९ बाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तथापि, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये यावर एकमत झालं नाही. २२ सप्टेंबर रोजी बिहारमध्ये शाळा सुरू करण्यासाठी बैठक होणार आहे. छत्तीसगडमध्ये एका आठवड्यानंतर शाळेबाबत निर्णय घेण्यात येईल. झारखंडमध्येही ३० सप्टेंबरपर्यंत सर्व शाळा बंद राहतील.

कोरोनाचा प्रभाव पाहता महाराष्ट्रात शाळा बंदच

करोनामुळं सर्वात प्रभावित झालेल्या महाराष्ट्र राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे.

मध्य प्रदेशात बहुतेक शाळा सुरू होतील

मध्य प्रदेशातील बहुतेक सरकारी आणि खासगी शाळा सोमवारपासून सुरू होतील. केवळ दोन तासांसाठी, विद्यार्थ्यांना शिकवता वेळी येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी खास वर्ग असतील. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सर्वांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.

आजपासून जम्मू-काश्मीरमध्ये शाळा सुरू होतील

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारपासून पन्नास टक्के कर्मचारी असलेल्या शाळा सुरू होतील. विद्यार्थी व कर्मचार्‍यांना मास्क घालणं बंधनकारक असल. मुलं त्यांच्याबरोबर सॅनिटायझर्स ठेवतील. शाळा सॅनिटायझर्स देखील पुरवतील. एकदा विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर, त्याला फक्त सुट्टीनंतर बाहेर जाता येईल.

हरियाणामध्ये देखील शाळा सुरू

सोमवारपासून हरियाणामध्ये सरकारी आणि खासगी शाळादेखील सुरू होतील. अद्याप नियमित वर्ग सुरू होणार नसले तरी नववी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षकांसमवेत कोणताही विषय समजून घेण्यासाठी व अभ्यासाशी संबंधित इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी शाळेत येऊ शकतात.

दिल्लीत ५ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहतील

दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसेना. यामुळंच दिल्ली सरकारनं ५ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तथापि, यावेळी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील.

उत्तर प्रदेशात संसर्ग संपल्यावर शाळा सुरू होतील

उत्तर प्रदेशच्या माध्यमिक शिक्षणाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आराधना शुक्ला यांनी सांगितलं की अद्याप शाळा सुरू होणार नाहीत. जेव्हा संक्रमणाची परिस्थिती सुधारली जाईल तेव्हाच शाळा उघडण्याचा विचार केला जाईल.

पंजाबातही शाळा सुरू होणार नाही

पंजाबमध्ये सध्या शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग केंद्रे उघडली जाणार नाहीत. यासंदर्भात नवीन आदेश राज्य सरकारनं शनिवारीच जारी केले आहेत. राज्यात सतत वाढत असलेल्या कोरोनाचा आलेख लक्षात घेता शाळा व कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीवाची जोखीम घेण्यास सरकार तयार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा