कल्याण, दि. १८ जुलै २०२०: केडीएमसीतील २७ गावांपैकी ९ गावं महापालिकेत ठेवण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने दिली. त्यानंतर निवडणूक आयोगानेही केडीएमसीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या बदलांमुळे आता महापालिकेत ११८ प्रभाग राहणार असून, त्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याप्रमाणे प्रभाग रचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले गेले.
गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ‘ई’वॉर्ड मध्ये तर नऊ प्रभाग ‘आय’वॉर्ड मध्ये होते. परंतु, आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा ‘आय’वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल, तर ‘ई’वॉर्ड महापालिकेत कायम राहील. दरम्यान, वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद बाद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. आता बदललेल्या हद्दीच्या आधारे आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेला प्रारंभ होणार आहे.
केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीतील लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ असली, तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे आता लोकसंख्या १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी राहिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे