एनडीए’मध्ये झाले जागांचे वाटप, जेडीयू १२२ आणि बीजेपी १२१ जागांवर लढवणार निवडणूक

बिहार, ७ ऑक्टोंबर २०२०: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागांचे वाटप झाले आहे. २४३ जागा असणाऱ्या बिहार विधानसभेमध्ये जेडीयू ला १२२ जागा मिळाल्या आहेत. यामधून जेडीयू आपल्या कोट्यातील जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा ला ७ जागा देईल. अशाप्रकारे जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल.

भारतीय जनता पार्टीला १२१ जागा मिळाल्या आहेत. मुकेश साहनी यांच्या विकासशील इंसान पार्टी’ला भाजप कोट्यातुन काही जागा देईल. काल पाटणा येथे पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जागावाटपाची घोषणा केली. नितीशकुमार म्हणाले की, एनडीए आपल्या कामाच्या बळावर राज्यात निवडणुका लढवेल. पत्रकार परिषद घेताना उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले की, जर आज रामविलास पासवान जी स्वस्थ असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

ते म्हणाले की, गरज भासल्यास आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहू की, एनडीएशी संबंधित केवळ चार पक्ष पंतप्रधानांचे चित्र वापरू शकतात, इतर कोणालाही पंतप्रधानांचे चित्र वापरण्याचा अधिकार नसणार. संख्या कोणाचीही किती येवू देत परंतु, मुख्यमंत्री नितिश कुमार असतील याबाबत कोणालाही शंका असू नये.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, नितीशकुमार यांच्या नेतृत्वात भाजप निवडणुका लढवेल आणि सरकार स्थापन करेल, त्यात कोणत्याही प्रकारची शंका घेण्याची संधी नाही. संजय जयस्वाल म्हणाले की, रामविलास पासवान लवकर बरे व्हावेत अशी एनडीए नेत्यांची इच्छा आहे, पण बिहारमध्ये भाजप नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवेल.

यापूर्वी सोमवारी बिहार कोअर कमिटीची बैठक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी झाली. भाजप बिहार कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि प्रदेश प्रभारी भूपेंद्रसिंग यादव सहभागी झाले.

२०१० मध्ये सोबत लढवल्या निवडणुका

यापूर्वी भाजपा आणि जेडीयू यांनी २०१० च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या. त्यानंतर जेडीयूनं १४१ आणि भाजपानं १०२ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत जेडीयूनं ११५ जागा जिंकल्या आणि भाजपाने ९१ जागा जिंकल्या.

२८ ऑक्टोबरपासून राज्यात सुरू होणाऱ्या निवडणुकांमध्ये एनडीए चा सामना तेजस्वी यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुतीशी असेल. महायुतीबाबत बोलायचं झालं तर आरजेडी १४४, काँग्रेस ७० आणि डावे पक्ष २२९ जागा लढवणार आहेत. आरजेडी, काँग्रेस, सीपीआई(माले), सीपीआई, सीपीएम हे महायुतीचे भाग आहेत.

एलजेपी स्वतंत्र लढवणार निवडणूक

निवडणुकीपर्यंत एनडीएचा भाग असलेल्या एलजेपीनौ एकट्यानं लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते जेडीयूच्या विरोधात आपला उमेदवार उभा करणार आहेत. एनडीएत जागा उपलब्ध नसल्यानं चिराग पासवान यांनी १४३ जागांसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या उमेदवारांना एलजेपीचा पाठिंबा असेल.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, दुसर्‍या टप्प्यात ३ नोव्हेंबरला मतदान होईल आणि तिसर्‍या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होईल. १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा