‘सेबी’ने भाजपच्या दबावाखाली वायदे बाजारावर बंदी आणली; काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी, २९ जानेवारी २०२३ : केंद्रातील भाजप सरकार नेहमीच शेतकरी विरोधी धोरण राबवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत सतत वाढच होत आहे. भाजप सरकारच्या दबावाखाली ‘सेबी’ने शेतकऱ्यांच्या वायदे बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे डाळी, कापूस, सोयाबीन, गहू, तांदूळ, हरभरा, तूर अशा पिकांच्या दरामध्ये खूप घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही; तसेच कोकणातील आंबा, सुपारी, नारळ यांसारख्या बागायतदार शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, काँग्रेसतर्फे सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

याविषयी दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
१) २०१५ पासून कोकणातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा रिकामा करावा, २) वायदे बाजारावरील बंदी त्वरित उठवावी, ३) नवीन देण्यात येणारे कर्ज ४ टक्के दराने देण्यात यावे, ४) रत्नागिरी तालुक्यात कृषी व आंबा संशोधनासाठी सुसज्ज व अद्ययावत विद्यापीठ स्थापन करावे, ५) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय शेती शाळा सुरू करावी, ६) कोकणातील शेतकऱ्याचे आंबा, काजू, सुपारी हे मुख्य उत्पादन असून, त्याच्यावर कोकणातील अर्थव्यवस्था निर्भर आहे. तरी माकड, वानर व इतर उपद्रवी वन्यप्राणी यांच्यामुळे खूप नुकसान होत असून, यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड साहेब यांना दिले. याप्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा चिटणीस रवींद्र खेडेकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवान शेख, नूतन गोरीवले इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा