जम्मू-काश्मीर, १३ ऑगस्ट २०२२: शुक्रवारी दुपारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा पोलीस स्टेशन परिसरात दहशतवाद्यांकडून पोलीस आणि सीआरपीएफ टीमवर गोळीबार करण्यात आला. ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याचबरोबर दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आलीय. गेल्या २४ तासांतील ही दुसरी दहशतवादी घटना आहे.
काश्मीर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. पोलिसांनी ट्विट केलं की, “अनंतनागच्या बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलिस/सीआरपीएफच्या जॉइंट नाका पार्टीवर गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजबेहारा येथील कुरकडल येथे कर्तव्य बजावत असलेल्या बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिजबेहारा पोलीस ठाण्याचे प्रमुख जखमी झाले आहेत. त्यांना एसडीएच बिजबेहरा येथे हलवण्यात आलं आहे.
खोऱ्यात टार्गेट किलिंग सुरूच
खोऱ्यात सातत्याने टार्गेट किलिंग होत आहे. शुक्रवारी पहाटे बांदीपोरा येथील अजस तहसीलच्या सदुनारा गावात दहशतवाद्यांनी एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं मृताचे नाव असून तो मोहम्मद जलीलचा मुलगा असून तो बिहारचा रहिवासी आहे. बिहारमध्ये १० महिन्यांत ७ जणांची हत्या करण्यात आलीय.
स्थलांतरित मजूर आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती
विशेष म्हणजे काश्मीर खोर्यातील टार्गेट किलिंगमुळं सरकारी कर्मचारी आणि स्थलांतरित मजूर दहशतीत दिसत आहेत. टीव्ही कलाकार, बँक मॅनेजर यांनाही येथे दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांतील सततच्या घटनांमुळं चिंता वाढली होती. त्यानंतर २६ दिवसांत टार्गेट किलिंगच्या १० घटना उघडकीस आल्यानंतर आता तेथून पलायनही सुरू झालं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे