जयपुर, २१ नोव्हेंबर २०२०: राजस्थानमध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांनंतर गहलोत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना २१ नोव्हेंबरपासून कलम -१४४ लागू करण्याचा सल्ला दिलाय. गृह विभागाच्या गट -९ नं सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सल्लामसलत जारी केली आहे. गृहसचिव एन.एल. मीना यांनी आदेश जारी केला आहे की, सर्व जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात यावा व तो काटेकोरपणे पाळला जावा.
जिल्ह्यातील कलम -१४४ लागू करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलीय हे विशेष. ज्यानंतर त्या भागांमध्ये हा कलम लागू होईल. कलम -१४४ लागू असलेल्या क्षेत्रात ४ किंवा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. तसंच त्या भागात पोलिस आणि सुरक्षा दलाव्यतिरिक्त कोणीही शस्त्रे बाळगू शकत नाही किंवा त्यांची वाहतूक करू शकणार नाही. विशेष म्हणजे संसर्गाचा धोका पाहता लोकांवर घराबाहेर पडण्यास देखील बंदी असंल. यासह वाहतुकीवर देखील अंकुश लावण्यात आलाय.
सणासुदीच्या काळात राज्यात कोरोनाची प्रकरणं सतत वाढू लागले आहेत. राजस्थानमधील वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या वेळी लोकांच्या गर्दी आणि घराबाहेर जाणं व खरेदी करताना कोरोनाचा संसर्ग पसरला असून त्यानंतर कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत.
यापूर्वी गुरुवारी राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारनं विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय प्रमोट न करण्याचा निर्णय घेतला. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही असा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. यासह गेहलोत सरकारनं ‘आओ घर में सीखें’ हा नवीन उपक्रम देखील सुरू केला आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास घेण्यास सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे