जम्मू-काश्मीर, 31 जानेवारी 2022: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. काश्मीरच्या आयजीपींनी सुरक्षा दलांसाठी हे मोठं यश असल्याचे वर्णन केलं आहे. जम्मू आणि काश्मीर डीजीपी यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चाररेश्रीफ आणि पुल्लामा जिल्ह्यातील नायरा येथे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले.
जाहिद मंजूर वानी हा जम्मू-काश्मीरमधील जैशच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी ज्या लेतपुरा घटनेत 40 हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते त्यात जाहिदचा सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कुलगाम जिल्ह्यात एका पोलिसाच्या हत्येनंतर पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मोठ्या संख्येनं लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेतला होता.
दुसरीकडं, शनिवारी संध्याकाळीच कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी झाडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्वत्र नजर ठेवली जात आहे. यासोबतच दहशतवाद्यांच्या धाडसाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे