जम्मू-कश्मीर, ९ जानेवारी २०२३ : राज्यात अलीकडेच झालेल्या दहशतवादी घटना लक्षात घेता, प्रजासत्ताकदिनापूर्वी पोलिस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण जम्मूमध्ये शोधमोहीम तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राजौरी जिल्ह्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. १ जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी धनगरी गावात एका विशिष्ट समुदायाच्या अनेक घरांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. त्या गावात झालेल्या दहशतवादी घटनेत सात जण ठार, तर १४ जण जखमी झाले होते.
लष्करासह सुरक्षा यंत्रणांनी आज सकाळी डोडा, किश्तवाड, रामबन आणि रियासी जिल्ह्यांतील विविध भागांत शोधमोहीम आणि घेराबंदी ऑपरेशन (CACO) सुरू केले. पोलिसांनी लष्कर आणि ‘सीआरपीएफ’च्या मदतीने राजौरीतील नौशेरा, बुधल, धरमसाळ आणि कालाकोट यासह डझनभर गावांमध्ये, सुंदरबनीमधील जंगले आणि नियंत्रण रेषेजवळील भागात घरोघरी शोध घेतला.
संशयित दहशतवादी कारवायांची कोणतीही माहिती नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की संशयित दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नसली तरी कोणताही दहशतवादी धोका दूर करण्यासाठी आणि प्रजासत्ताकदिनापूर्वी परिसर सुरक्षित करण्यासाठी शोध घेतला जात आहे. अलीकडेच सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न होत असताना सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड