मुंबई, दि. १६ जून २०२० : पत्रकारितेतील एक मोठे नाव तसेच पत्रकारितेचे मूल्य जपणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज निधन झाले. मुंबईतील दादर इथल्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दलित, आदिवासींच्या प्रश्नांना कायम वाचा फोडणारे निस्वार्थ पत्रकारिकेचा आदर्श अशी त्यांची ओळख होती. पत्रकारिता क्षेत्रात दिनू रणदिवे यांचं महत्त्वाचं योगदान होते. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
समाजवादी पक्षाने १९५५ मध्ये छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामात ते सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. या लढ्यात त्यांनी कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरु केले. – रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात इथूनच झाली.
दिन रणदिवे ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये रुजू झाले आणि महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं. बांगलादेश युद्धाचे त्यांनी प्रत्यक्षात जाऊन वार्तांकन केलं होतं. भिवंडी आणि वरळी दंगलीचे भयानक सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते ‘मटा’तून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका आणि लोकमित्र या नियतकालिकेचे संपादन त्यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी