ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचं निधन

ठाणे: शब्दांचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.  ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी’… ‘मी कशाला आरशात पाहू गं? मी कशाला बंधनात राहू गं?’… या आणि अशा असंख्य अवीट गोडीच्या गाण्यांनी मुरलीधर गोडे यांनी रसिकांवर अधिराज्य गाजवले.

मुरलीधर गोडे यांनी ठाणे येथील निवासस्थानी गुरुवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गोडे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ५५ वर्षांहून अधिक काळ घट्ट मैत्री होती. देहदान करण्याच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी सोपस्कार पूर्ण केले. चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले गोडे हे अतिशय साधे, सरळ आणि विनम्र स्वभावाचे होते.

गोडे हे मूळचे ठाण्यातले. त्यांचा जन्म १८ जून १९३७ रोजी झाला. पाचवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत आणि नंतर मो.ह. विद्यालयात झाले. पुढे वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना महाड येथे जावे लागले. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. ठाण्यात परतल्यावर पुढचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रु ईया आणि सिद्धार्थ कॉलेजमधून पूर्ण केले. संस्कृत विषय घेऊन एम.ए, बी.एड करून प्रौढ शिक्षण (अ‍ॅडल्ट एज्युकेशन) यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली आणि शिक्षण क्षेत्रावर आपले प्रभुत्व सिद्ध केले.

‘टीच वन टीच वन’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. मुंबई विद्यापीठात त्यांनी प्रौढ शिक्षण कार्यक्र म म्हणून २० वर्षे प्राध्यापकाची नोकरी केली. पत्रकारिता, साहित्य क्षेत्र, सिनेसृष्टी, नाटक, रंगभूमी, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ते मुशाफिरी करू लागले. १९९६ ते १९९९ या कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा लाभलेले गोडे हे महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष होते. याच काळात साक्षरतेसाठी अनेक पुस्तकांचे लिखाण, अभ्यासपूर्ण लेख, मार्गदर्शिका, पथनाट्ये त्यांच्याकडून साकारली गेली. त्यातील दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. पुढे मुंबई आकाशवाणीसाठी शंभरहून अधिक रचना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रसारित झाल्या आणि दूरदर्शनसाठी जवळजवळ १०० उत्तमोत्तम संहिता, तर काही शीर्षकगीतेही लिहिली. आतापर्यंत त्यांनी १५ अनुबोधपटांचे लेखन केले आणि सुमारे २० लघुपटांचे लेखन राज्य शासनाकरिता केले होते. टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिली आहेत.

प्रीतीचं झुळझुळं पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं’, ‘अरे ले लो भाई चिवडा लो’ आणि ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही ‘बन्या बापू’ चित्रपटातील त्यांची चारही गाणी त्याकाळी प्रचंड गाजली होती. त्यांनी एकूण १४ चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. अनेक टीव्ही मालिकांसाठीही त्यांनी शिर्षक गीते लिहिली. अलिकडेच आलेल्या ‘ढोलताशा’ सिनेमासाठीही त्यांनी गाणी लिहिली होती. गीतकार आणि कवी म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा