नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२०: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारामध्ये चांगली वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्युच्युअल फंडासाठी ५०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
बीएसईचा सेन्सेक्स ४१६ अंक अर्थात १.३३ टक्क्यांनी वाढून ३१,७४३ वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी फिफ्टी निर्देशांकात १२८ अंक अर्थात १.४० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.५ टक्क्यांपर्यंत वाढले.
निफ्टी फिफ्टी निर्देशांकात ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या शेअर्स मध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर इंडसलैंड बँक, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, हिंडाल्को, यूपीएल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले.
दुसरीकडे एनटीपीसीच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय केवळ एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब्ज, भारती एअरटेल, ग्रासिम इंडस्ट्रीज, इंडियन ऑईल आणि आयटीसी यांनी लाल निशाणी म्हणजेच घसरणीत आपला कारभार बंद केला.
सोमवारी सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकांनी वेग दाखविला. खासगी बँक निर्देशांकात तीन टक्क्यांपर्यंत नफा दिसून आला तर आयटी निर्देशांक अडीच टक्क्यांपर्यंत वाढला. फायनान्स सर्व्हिसेस निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे