लातूर, ३० सप्टेंबर २०२२ : अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरून गेली. आज या घटनेला २९ वर्ष पूर्ण झाली. पण, महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस कधीही विसरला जाणार नाही. १९९३ सालचा ३० सप्टेंबर, गणपती विसर्जनानंतर चा हा दिवस लातूर जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला. हजारोंच्या संख्येत लोक झोपेतच जमीनीखाली मृत्यूमुखी पडली. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावची त्या वेळची अवस्था काळजाला पिळवटणारी होती. झोपेतच ढिगाऱ्याखाली गडून मृत्यूमुखी पडलेली लोक, ढिगाऱ्यांत अडकलेले मृत्यू देह, मदत काम करण्यासाठी धावपळ करणारे स्वयंसेवक, जखमेने भरलेले अंग, उभा संसार डोळ्यासमोर धुळीत मिळालेला बघून हवालदिल झालेली नागरिक, आपल्या नातलगांना ढिगाऱ्याखाली शोधणारी ग्रामस्थ, आणि सर्वत्र पेटून उठलेला लोकांचा हाहाकाराचा आवाज.
या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्यूमुखी पडले तर १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला. जवळपास १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील अंदाजे ३०,००० पूर्णपणे जमीन दोन झाली. तर १३ जिल्ह्यातील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या तालुक्यांना या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यातील एकूण ५२ गावे उध्वस्त झाली. ह्या भूकंपाने एकाएकीच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वकाही होत्याचे नव्हते केले. या भूकंपामुळे १९९३ सालचा ३० सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात लातूर जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी