सीरियल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे मुंबईत निधन

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२०: पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत जबरदस्त दहशत निर्माण केलेला सीरियल किलर रमन राघव याच्या मुसक्या आवळत त्याला अटक करणारे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी अ‌ॅलेक्स फियालोह यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी शनिवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. अ‌ॅलेक्स फियालोह यांना रामन राघवला अटक केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. ते मुंबई पोलीस दलातून सहायक पोलीस आयुक्तपदावरुन सेवानिवृत्त झाले होते.

मुंबईकरांना रमन राघवच्या दहशतीतून मुक्त करणाऱ्या फियालोह यांच्या कारवाईवर खूश होऊन पोलीस दलाने त्यावेळी त्यांनी १००० रुपयांचं बक्षीस देऊ केलं होतं. उत्तर मुंबई रमन राघवने पुरुष, स्त्रीया आणि लहान मुलं अशा ४१ लोकांच्या हत्या केल्या होत्या. फियालोह नामवंत हॉकी खेळाडू होते ते मुंबई पोलिसांच्या संघाकडून खेळत होते. फियालोह यांनी १९६२ मध्ये पोलीस दलातील नोकरी स्वीकारली होती.

राघवला पकडण्यासाठी विशेष पथक

१९६८मध्ये दोन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये प्रचंड हत्यासत्र सुरु होतं. बेघर लोकांच्या हत्या होत होत्या, त्यामुळे मुंबईत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक रात्र झाल्यानंतर घराबाहेर पडण्यास घाबरत होते. घराबाहेर पडायचंच असेल तर स्वसंरक्षणासाठी स्वतःजवळ काठी किंवा हत्यारं बाळगत होते. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले इमॅन्युएल मोडक हे या हत्यासत्राचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षक विनायकराव वाकटकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमलं होतं. प्राथमिक तपासानंतर रेकॉर्डवरील एक गुन्हेगार जो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या रमन राघववर लक्ष केंद्रीत केलं. यावेळी अॅलेक्स फियालोह हे वाकटकर यांच्या टीममध्ये होते. आपल्या खिशामध्ये ते रमन राघवचा फोटो कायमच ठेवत होते. दरम्यन, २४ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांना ही फोटोतली व्यक्ती डोंगरी भागात फिरताना दिसली. त्यानंतर ते त्याच्याजवळ चालत गेले आणि त्याला ताब्यात घेतलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा