भीमा नदीतून सात दिवसांत एकाच कुटुंबातील सात मृतदेह बाहेर; स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पुणे, २५ जानेवारी २०२३ : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडले आहेत. पोलिसांनी मंगळवारी (ता.२४) ही माहिती दिली. पुणे शहरापासून सुमारे ४५ किमी अंतरावर दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीत भीमा नदीवरील पारगाव पुलाजवळ मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सातही जण एकाच कुटुंबातील असून त्यात वृद्ध जोडपे, त्यांची मुलगी, जावई आणि तीन नातवंडे यांचा समावेश आहे.

भीमा नदीच्या पात्रात एकमेकांपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर हे मृतदेह आढळून आले. मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. पोलिस आत्महत्येसह सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार भीमा नदीतून मृतदेह मिळण्याची प्रक्रिया सात दिवसांपासून सुरू आहे. ता. १८ जानेवारी रोजी भीमा नदीवर काही स्थानिक मच्छीमार जाळी टाकून मासेमारी करीत होते. तेव्हाच महिलेच्या मृतदेहाला स्पर्श झाला. त्यानंतर पोलिसांची झोप उडाली. ‘एनडीआरएफ’चे पथक रात्री उशिरापर्यंत परिसरात तपास करीत होते. त्यानंतर ता. २० जानेवारीला एका पुरुषाचा, ता. २१ जानेवारीला पुन्हा एका महिलेचा आणि ता. २२ जानेवारीला पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाच दिवस उलटल्यानंतर मंगळवारी (ता.२४ जानेवारी) पुन्हा एकदा तीन मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा