शहरात रस्त्यावर होणारी भाजी विक्री थांबवावी: मार्केट यार्ड कामगार युनियन

पुणे, दि. २ जून २०२०: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यातील सर्व भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले होते. मुळात जिथे भाजीपाल्याची आवक होते ते मार्केटयार्ड देखील बंद होते. या काळात शहरातील अनेक चौकांमध्ये व रस्त्यावर भाजीपाला विकण्यास सुरुवात झाली होती. परंतू आता रविवारपासून गुलटेकडी येथील मार्केट यार्ड सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांवर विकला जाणारा भाजीपाला बंद करावा अशी मागणी मार्केट यार्ड मधील कामगार युनियनने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कामगार युनियनने दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मार्केट यार्ड आता पुन्हा सुरू झाले आहे. तरीसुद्धा शहरातील विविध ठिकाणी व रस्त्यांवर भाजीपाला व फळ विक्री सर्रास चालू आहे. अशा ठिकाणी विक्री होत असलेल्या जागेवर नागरिकांकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही किंवा सोशल डिस्टंसिंग ठेवले जात नाही. यामुळे शहरात प्रादुर्भाव आणखीन पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित भाजीपाल्यांची होत असणारी अशी विक्री थांबवावी व भाजीपाला व फळ विक्री मार्केट यार्डच्या आवारा मध्येच केली जावी.

पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, समितीकडून बाजाराच्या आवारामध्ये सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे अनाहक होणाऱ्या गर्दीमधून प्रादुर्भाव होणे टाळू शकतो. तसेच नागरिकांपर्यंत चांगली फळे व भाज्या पोहोचवल्या जाऊ शकतात.

याबाबत योग्य ती कारवाई करून बाहेर विक्री करत असलेले अडते व्यापारी व नव्याने सुरू करण्यात आलेले भाजी विक्रीचे धंदे यांना समजावून सदर भाजीविक्री बाजाराच्या आवाराच्या आत करण्यास सांगावी. जेणेकरून बाजार आवारातील कामगार व इतर घटकांची उपासमार थांबेल व रोजगार निर्माण होईल. याचबरोबर बाजार समितीचे कामकाज देखील सुरळीतपणे सुरू राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा