पुणे, ११ डिसेंबर २०२२ : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आहेत. तर यामध्ये ३ पोलीस अधिकारी आहेत. कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पडले आहेत. या घटनेनंतर आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात गदारोळ सुरू आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काल पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.