ढाका, ११ ऑगस्ट २०२३ : बांगलादेशने आज (शुक्रवारी) अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला आशिया चषक आणि २०२३ विश्वचषक या दोन्हीसाठी वनडे कर्णधार म्हणून नियुक्त केले. या दोन मोठ्या स्पर्धांव्यतिरिक्त, सप्टेंबरच्या उत्तरार्धात बांगलादेशची पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेत न्यूझीलंडशी लढत होईल आणि त्यानंतर बांगलादेश संघ ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात जाईल.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले, आम्ही आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी शाकिबची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेसाठी उद्या संघ जाहीर होणार आहे. निवडकर्ते १७ सदस्यांचा संघ निवडतील.
पाठीच्या दुखापतीमुळे तमिम इक्बाल आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी शाकिब खेळणार आहे. आता शाकिब खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार बनला आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून तो संघाचा कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे. बांगलादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून शाकिबचा शेवटचा सामना १२ मे २०१७ रोजी आयर्लंडविरुद्ध होता. शाकिबने ५३ एकदिवसीय, १९ कसोटी आणि ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड