मुंबई : वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, अशी भयानक चर्चा मुंबईत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रंगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या (आयबी) १३ ते १४ वर्ष वयोगटातील आठ विद्यार्थ्यांचे शाळेतून निलंबन करण्यात आलं आहे.
व्हॉट्सअप ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींच्या आईंच्या वाचनात हे चॅट आल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आहे. धक्का बसलेल्या दोन्ही महिलांनी शाळेत धाव घेत, हा प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर घातला. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेत जाण्यासही नकार दर्शवला आहे.
याबाबत ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उमटली आहे. देशातच नव्हे, तर राज्यातही बलात्काराच्या काही घटनांमध्ये आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेआहे. अशातच १३-१४ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलं बलात्कार करण्यारख्या असंवेदनशील गप्पा मारत असतील, तर ते भयावह म्हणायला हवं.
संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये बरंच मोठं चॅट रंगले होते. विशेष म्हणजे त्यात ‘गँग बँग’ म्हणजेच सामूहिक बलात्कार आणि ‘रेप’ अशा शब्दांचा भरणा होता. वर्गमित्रांच्या शरीरयष्टीवरील भाष्य (बॉडी शेमिंग) किंवा त्यांना समलिंगी संबोधणं (गे, लेस्बियन) या गोष्टीही संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये सुरु होत्या.
८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ग्रुपवर या विषयी चॅट झाले होते. सुरुवातीला अनेक मुलींभोवती रेंगाळणारं चॅट अखेरीस दोघींविषयी झालं. ‘आपण एका रात्री जाऊन बँग करुया’ अशा एका विद्यार्थ्याच्या कमेंटवर दुसऱ्यांनी होकार भरला. ‘मी तिला नष्ट करेन’ आणि ‘मी तिचं अस्तित्वच मिटवेन’ अशी हिंसक भाषाही त्यांच्या तोंडी दिसते. या प्रकरणाची शाळेने गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईबाबत तपासणी सुरु आहे.