बारामती (प्रतिनिधी): राज्यातील सत्ता गमावल्यानंतर माजी मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. ४) रोजी बारामतीत येत आहेत. पक्ष संघटन वाढविण्यावर ते भर देणार असून तालुक्यातील कारखान्यांच्या निवडणूकीची रणनिती यावेळी आखली जाणार आहे.
पाटील हे शनिवारी बारामतीत येत असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. बारामती तालुक्यात आगामी काळात माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूका होत आहेत. याशिवाय बारामती सहकारी बॅंकेचीही निवडणूक लवकरच होत आहे. बारामती तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका भाजपकडून लढविल्या जाणार असल्याचे पाटील यांनी सत्तेवर असताना बारामतीतच जाहीर केले होते. यासंबंधी भाजप आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
बारामतीत दुपारी दीड वाजता भाजप कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार आहेत. बारामती अगोदर लासुर्णे येथे रामभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी बारा वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर बारामती कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढे पिंपरी चिंचवडला जाणार आहेत.