शरद पवार यांनी राष्ट्रवादीत नेमले दोन कार्याध्यक्ष, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष पदी वर्णी

नवी दिल्ली, १० जून २०२३ : गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत देत राजीमाना दिला होता. त्यानंतर तो कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे मागे घेतला होता. पण त्यांनी पक्षात बदलाचे संकेत दिले होते.आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त घोषणा करताना अनेकांना धक्का दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन कार्याध्यक्षांची घोषणा केली. त्यात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पवारांनी ही घोषणा केली त्यावेळी व्यासपीठावर फक्त अजित पवार उपस्थित होते. पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांव्यतिरिक्त राज्यसभेची जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, यूपी आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांना राष्ट्रवादीत सध्यातरी कोणतीही जबाबदारी न दिल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली. त्याचबरोबर खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

परंतु अजित पवार यांच्यांवर सध्यातरी कोणतीही जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांच्या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार माध्यमांशी कोणताही संवाद न साधता तेथून निघून गेले. तसेच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीत ते नव्हते. यामुळे अजित पवार नाराज आहे का? यावर चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेरबदलानंतर ट्विट केले आहे. त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने कामे करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन!, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा