शरद पवार आज विरोधकांच्या बैठकीला जाणार नाही, अचानक कार्यक्रम रद्द

मुंबई, १७ जुलै २०२३: आज बंगळुरूमध्ये केंद्र सरकारविरोधात विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यात शरद पवारही सहभागी होणार होते. पण, आता मिळालेल्या वृत्तानुसार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. पवारांचा बेंगळुरू दौरा रद्द झाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आज शरद पवार बेंगळुरूऐवजी मुंबईत असतील. शरद पवार पक्षाच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अशा स्थितीत शरद पवार यांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार गटातील आमदार पावसाळी अधिवेशनात आमने-सामने येणार आहेत. अधिवेशनापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून, राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही विरोधी पक्षात असून ९ मंत्री वगळता उर्वरित पक्षाच्या आमदारांना विरोधी बाकावर बसवावे, अशी मागणी केली आहे.

येत्या २०२४ च्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची पहिली बैठक पाटण्यात पार पडली. यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक होत आहे. विरोधकांसाठी आजची ही बैठक महत्त्वाची आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा