शरद पवार यांची मंचर येथील भाग्यलक्ष्मी डेअरीला भेट

पुणे, दि. १ ऑगस्ट २०२०:  एकीकडे राज्यभर आज दूध आंदोलन पेटलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार मात्र या आंदोलनावर टीका-टिप्पणी न करता याच विषयाच्या अभ्यास दौऱ्यावर खास आंबेगाव तालुक्यात पोहोचले.

पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड व पराग उद्योग समूहाला भेट देऊन दूध धंद्यातील अडचणी आणि उत्पादकता वाढीसाठी काय करता येईल हे जाणून घेतलं. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपस्थित होते.

शेतकऱ्याला जर दूध धंद्यात टीकायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकीकडे गायीचं दूध वाढवण्यावर आणि वाढलेल्या दुधावर प्रोसेसिंग करण्याशिवाय पर्याय नाही. ”उत्पादकता वाढली तर दूध धंद्याला स्थिरता येईल” असं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं.

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा “सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर डेअरी” हा प्रकल्प उभा राहत असून त्यात शेतकऱ्यांच्या संकरित व होस्टेन जातीच्या दुभत्या गायींची दूध क्षमता वाढवण्यासाठी आणि दुभत्या जनावरांमधील संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे.

दरम्यान, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचा दूध आंदोलनावरून चांगलाच समाचार घेतला. भाजपवाले मागील पाच वर्षांपासून सत्तेत होते, मात्र दूध उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप सरकारने कुठल्याही उपाययोजना केल्या नसून आज भाजपने दूध दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे, हे भाजपाचे आंदोलन राजकीय आंदोलन आहे, असा टोला त्यांनी लगावला.

देशात व राज्यात कोरोना महामारीचं संकट आहे. या संकटातही राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदीचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकऱ्यांच्या दुधाचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या व शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काळात दुधाचे दर व निर्यातीबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात विचारविनिमय सुरू असून यावर योग्य तो निर्णय राज्य सरकार घेईल,असा विश्वास वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा