शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सध्या प्रमुख राजकीय नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याच्या नव्या धोरणांतर्गत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही पूर्व कल्पना न देता ही सुरक्षा हटविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय अशी कल्पना देखील पवार यांच्या कार्यालयाला देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था गृहखात्यातर्फे पुरविली जाते. असलेल्या धोक्‍याचा नैमित्तिक आढावा घेऊन त्यात बदलही केला जातो.
सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर गृह खात्याने होकार दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत बदलाचा अथवा पूर्णपणे हटविण्याचा निर्णय केला जातो. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दळाच्या जवानांमार्फत सुरक्षा दिली जाते. याअंतर्गत शरद पवार यांच्या ‘सहा जनपथ’ या निवासस्थानी दोन्ही सेवांमधील सहा जवानांचा ताफा सुरक्षेसाठी सातत्याने तैनात असतो. मात्र हे सर्व सुरक्षा कर्मचारी सोमवारपासून (दि. २०) गायब झाले आहेत. अशाच प्रकारे दिल्लीतील ४० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत गृहखात्याकडे विचारणा केली असता असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे सांगण्यात आले.
दिल्लीत सुरू असलेली आंदोलने, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुरक्षेसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ पाहता सरकारने या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उपयोग अन्यत्र केला असू शकतो, असा कयास लावला जात आहे. मात्र, अतिमहत्त्वाच्या सुरक्षेतील तैनात कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या पाहता ही कारणेही तकलादू मानली जात आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांची सुरक्षा मात्र प्रचंड प्रमाणात वाढविण्यात आली आहे. नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासाच्या परिसरात आंदोलन होऊ नये, यासाठी या मार्गावरील वाहतूकच अन्यत्र वळविण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा