मुंबई, १७ ऑक्टोंबर २०२२ : अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर विचार करत बैठका घेत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शरद पवार यांनी यावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले की, मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी माझी मागणी नव्हती. मी मागणी कशी करणार? मी फक्त भाजपला तसं सूचवलं होतं. सूचवल्यानंतर त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. तो सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याच्या खोलात मी जात नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
तसेच, आता अंधेरी निवडणुकीत जे अपक्ष उभे आहेत त्या इतर लोकांनीही माघार घेतली तर बरं होईल. त्यांनी माघार घेतली तर निवडणूक होणार नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही आवाहन करणार नाही, असं पवारांनी मत स्पष्ट केलं आहे.
भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला त्याचं श्रेय ते राज ठाकरे यांना देत आहेत. या संदर्भात पवारांना विचारलं असता त्यांनी मिश्किलपने म्हंटलं की, कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर शंका उपस्थित करण्याची गरज नाही. ही वर्षं दीड वर्षांची निवडणूक होती. जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्यानंतर आपण असाच निर्णय घेतो असं शरद पवार म्हणाले.
MCA निवडणुक
एमसीएच्या निवडणुकीत आम्ही राजकारण आणत नाही. कोणताही सदस्य राजकारण आणत नाही. आम्ही शेलाारांना अध्यक्ष केलं होतं. इथं पक्ष असा नाही. मी तर एमसीएच्या निवडणुकीत उभाही नाही, असे बोलत पवारांनी नाना पटोलेंच्या वक्तव्या वर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे