Share Market Investment Fraud in Pune: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाला तब्बल ४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना बाणेर येथे उघडकीस आली आहे. बनावट ईमेल आयडी आणि खोट्या करारांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे.
सूदर्शन श्रीकांत लाठकर (३३, रा. बाणेर) यांनी या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिरुमलशेट्टी व्यंकटेश्वर राव ऊर्फ टी. व्ही. राव आणि तिरुमलाशेट्टी राघव (दोघेही रा. आंध्र प्रदेश) यांच्यासह काही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी एका नामांकित संस्थेच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केले. या ईमेल आयडीवरून लाठकर यांना शेअर खरेदी-विक्रीच्या बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट्स पाठवण्यात आल्या. सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला, ज्यामुळे लाठकर यांना ही गुंतवणूक फायदेशीर वाटली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपये उकळण्यात आले. यापैकी ९९ लाख रुपये परत करण्यात आले, परंतु उर्वरित सुमारे ३.९८ कोटी रुपये परत न करता संशयितांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि लाठकर यांची फसवणूक केली.
या घटनेमुळे गुंतवणुकीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकानी कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची सखोल चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
