गोल पोस्ट महाराष्ट्र महापालिकेच्या डीपीविरोधात थेरगावमध्ये निवारा हक्क संवाद यात्रा; रहिवाशांचा एल्गार!

महापालिकेच्या डीपीविरोधात थेरगावमध्ये निवारा हक्क संवाद यात्रा; रहिवाशांचा एल्गार!

Thergaon DP Protest and Nivara Hakk Samvad Yatra
निवारा हक्क संवाद यात्रा;

Thergaon DP Protest and Nivara Hakk Samvad Yatra: पिंपरी-चिंचवड महापालिकेने रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर आणि बिजलीनगर येथील घरांवर टाकलेल्या प्रस्तावित विकास आराखड्याविरोधात (DP) आणि रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी थेरगावमध्ये रविवारी एक भव्य निवारा हक्क संवाद यात्रा काढण्यात आली. “स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ” च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून स्थानिकांनी महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.

या संवाद यात्रेत चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील, राहुल कलाटे, इम्रान शेख, नरेंद्र बनसोडे, मनोज पाटील, देवेंद्र भदाणे, रामचंद्र ढेकळे आणि सतीश नारखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने बाधित नागरिक सहभागी झाले होते.

धनाजी येळकर पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महापालिकेने रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर आणि बिजलीनगर येथील रहिवाशांच्या घरांवर ३० मीटर रिंग रेल्वे रोड, १५ व २४ मीटर रस्त्यांसह विविध प्रकारची आरक्षणे टाकली आहेत. या आरक्षणामुळे हजारो घरांवर टांगती तलवार आहे आणि रहिवाशांचा याला तीव्र विरोध आहे.

पीएमआरडीएचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला, त्याचप्रमाणे लोकांची घरे उद्ध्वस्त करणारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा विकास आराखडा देखील मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

“घरे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची!” अशा घोषणा देत, “निवारा हक्क संवाद यात्रा” ही महापालिका प्रशासन आणि सरकारविरोधातील संघर्षाची सुरुवात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. जर हा प्रस्तावित डीपी रद्द झाला नाही, तर ३० जून रोजी थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर बंद ठेवून नेत्यांना गावबंदी केली जाईल आणि पावसाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य मोर्चा नेला जाईल, असा इशारा धनाजी येळकर पाटील यांनी दिला. यामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version