गोल पोस्ट अर्थ शेयरबाजार शेअरबाजार नव्या उच्चांकावर

शेअरबाजार नव्या उच्चांकावर

मुंबई: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्य-पूर्वेत निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी नवा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ४१८९३ अंकापर्यंत नवा रेकाॅर्ड केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने १२३७७ अंकांचा नवा विक्रमी स्तर गाठला आहे. अमेरिका आणि इराण संघर्ष निवळला आहे. चीनसोबत सुरु असलेल्या व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेचा पहिला टप्पा लवकरच व्हाईट हाऊसमध्ये पार पडणार आहे.

दरम्यान, खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. या सर्व घडामोडी शेअर बाजारातील तेजी वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सामान्य करदात्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून कर स्तर बदलणे किंवा वैयक्तिक करात कपात केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version