‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने शेगावनगरी दुमदुमली; गजानन महाराजांच्या प्रकटदिनी लाखो भाविकांची हजेरी

बुलडाणा, १३ फेब्रुवारी २०२३ : श्री संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकटदिन. त्यानिमित्ताने श्रींच्या समाधिस्थळाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहिले आहेत. शेगावनगरी उत्साहाने व मंगलमय वातावरणाने फुलून गेली आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात ‘गण गण गणात बोते’ असा गजर सर्वत्र सुरू आहे.

राज्याच्या विविध भागांतून ११००हून अधिक पायदळ पालखीच्या भजनी दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. दर्शनबारीत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शिस्तीने व शांततेत श्रींचे दर्शन होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची अलोट गर्दी असल्याने श्रींचे मंदिर दर्शनासाठी आज २४ तास खुले ठेवले जाणार आहे.

मंदिर परिसरात समाधी दर्शन, मुख दर्शन, पारायण कक्ष व महाप्रसाद वितरण यासाठी एकेरी रहदारी व्यवस्था ठेवली आहे. प्रकट दिन उत्सवानिमित्त मंदिर परिसर फुलांच्या माळा व विद्युत रोषणाईने सजला आहे. मंदिर प्रांगणात यज्ञयाग, पूर्णाहुती आदी विधिवत धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शेकडो भजनी दिंड्यांना १० टाळ, वीणा, मृदंग, हातोडी व ६ पताका असा भजनी साहित्याचा संच संस्थानतर्फे प्रथेप्रमाणे भेट देण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा