शेकडो वर्षाच्या समाज आरतीची परंपरा वाल्हेकरांनी जपली

9

पुरंदर, दि. १९ जून २०२०: पिटू भक्तीचा डांगोरा !! कळीकाळासी दरारा !! तुका म्हणे करा !!जयजयकार आनंदे !! या उक्तीला अनुसरून वाल्हेकरांनी कोरोनाच्या संकटातही माऊली माऊलींचा जयघोष करत ज्ञानेश्वरीच्या पुजनाने शेकडो वर्षाच्या समाजआरतीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

दर वर्षी आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शुक्ल त्रयोदशीला माऊलींचा मुक्काम महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत असतो. पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या लाखो पावलांना दुपारच्या वेळी या ठिकाणी विसावा मिळत होता. परंतु कोरोनाच्या संकटात सुरक्षिततेच्या दृष्टीने वारकऱ्यांच्या या भक्तीला देखील मुरड घालावी लागल्याने येथील ग्रामस्थांसह वारकरी संप्रदाय पुरता अस्वस्थ झाला होता.

परंतु अशा परिस्थितीतही माऊलींचा पालखी सोहळा आपल्या गावात विसाव्यासाठी येणार याचा काल्पनिक आनंद मनामध्ये बाळगून येथील महर्षी वाल्मिकी पालखी सोहळ्यातील मोजक्या वारकऱ्यांसह गावातील माऊली भक्तांनी येथील पालखी तळावरील माऊलींच्या चौथऱ्यावर ज्ञानेश्वरी व तुकोबारायांच्या गाथेचे अधिष्ठान ठेवून पुजाअर्चा करत मोठ्या उत्साहाने समाजआरती केली. यावेळी सोशल डिस्टंस पाळत मास्कचा वापर करत, सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन देखील करण्यात आले होते.

या समाजआरतीस महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे ह.भ.प.अशोक महाराज पवार यांसह ग्रामपुरोहीत सचिन देशपांडे, अभय देशपांडे, तसेच भाऊसाहेब चव्हाण, पांडुरंग पवार, रामचंद्र पवार, भगवान चव्हाण, अभिजित पवार, प्रवीण पवार, आशिष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे