यू एस, दि. २८ मे २०२०: आणखी एक भारतीय प्रतिभा अमेरिकेत कॉर्पोरेट जगाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. व्हिडीओ चॅट अॅप चालविणार्या झूम इंकने भारतीय वंशाच्या वेलचमी शंकर लिंगम यांना अभियांत्रिकी प्रमुख म्हणून नेमले आहे.
शंकरलिंगम झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स इन्क. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक एस युआन यांना थेट अहवाल देतील. ते कंपनीच्या अभियांत्रिकी व उत्पादने विभागाचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. ते कंपनीच्या अभियांत्रिकी उत्पादन व विकास टीमची देखरेख करतील. त्यांची नियुक्ती १२ जूनपासून लागू होणार आहे.
टेक जगात भारतीयांचे प्रभुत्व
विशेष म्हणजे अमेरिकेच्या टेक जगात भारतीय वंशाचे व्यक्ती आपल्या कलागुणांचा सतत ध्वज फडकवत राहिले आहे. गूगल (अल्फाबेट) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई पासून ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांच्यापर्यंत भारतीय मूळचे व्यक्तिमत्व संपूर्ण जगात आपली प्रतिभा गाजवत आहेत
शंकरलिंगम यांनी व्हीएमवेअर या सॉफ्टवेअर कंपनीत सुमारे ९ वर्षे काम केले होते, त्यानंतर ते झूम या व्हिडिओ चॅट अॅप चालवणाऱ्या कंपनीत सामील झाले. शेंकरलिंग क्लाऊड सर्व्हिसेस डेव्हलपमेंट आणि व्हीएमवेअरचे ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. व्हीएमवेअरपूर्वी, ते वेबएक्स येथे अभियांत्रिकी व तांत्रिक ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष होते.
चेन्नईमध्ये केले शिक्षण
शंकरलिंगमच्या लिंक्डइन प्रोफाइल नुसार हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीजचा त्यांचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी चेन्नई, अण्णा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये बीई केले आहे. त्यानंतर त्यांनी १९८९-९० मध्ये अमेरिकेच्या नॉर्दन इलिनॉयस युनिव्हर्सिटीमधून संगणक विज्ञान विषयातील एमएस केले. १९९३ आणि १९९५ मध्ये त्यांनी स्टोनी ब्रूक विद्यापीठातून बिजनेस आणि पॉलिसी मध्ये एमएस केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी