हिंस्त्र पशूच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

6

नाशिक, ८ जानेवारी २०२३ : निफाड तालुक्यातील मरळगोई येथे हिंस्त्र पशूने मेंढ्या चारणाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात मेंढपाळाच्या हातावर व चेहऱ्यावर हिंस्त्र पशूने पंजा मारला आहे. या घटनेमुळे मरळगोई परिसरात हा हिंस्त्र पशूची दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मरळगोई बुद्रुक येथे मेंढ्या चारत असताना भाऊसाहेब रामभाऊ जाधव (वय ४१) यांच्यावर एका हिंस्त्र पशूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात श्री. जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून अज्ञात हिंस्त्र पशूचे दात लागल्याची खूण असून चेहऱ्यावरही पंजाने ओरखडले आहे.

श्री. जाधव यांना लासलगाव येथे प्राथमोपचार करून अधिक उपचारासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या परिसरातून काही महिन्यांपूर्वी बिबट्या पकडला गेला असल्याने सदरहू हिंस्त्र पशू बिबट्याच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; मात्र सदरच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा