चंद्रपूर : जिल्ह्यातील एका मद्यपी शिक्षकाने शाळेच्या वेळात शाळेजवळ असलेल्या शेताच्या बांधावर चक्क झोपून ‘कर्तव्य’ बजावल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली . मात्र त्या दरम्यान आपले शिक्षक झोपेतून कधी उठणार आणि कधी शिकवणार हा प्रश्न मनात घेऊन अनेक विद्यार्थी ‘त्या’ तळीराम शिक्षकाच्या उठण्याची वाट पाहात राहिले. अखेर गावकरी आणि पोलिसांनी ‘त्या’ मद्यपी शिक्षकाला गाढ झोपेतून उठवले. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ या गावात घडला.
याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत भंगारपेठ गावात ही प्राथमिक शाळा आहे. तेलंगणा राज्यालगत असलेल्या या परिसरात दारुचे प्रमाण प्रचंड आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या तेलंगणातून या परिसरात दारुची आयात केली जाते. गटग्रामपंचायत भंगाराम तळोधी अंतर्गत येणाऱ्या भंगारपेठ गावात २ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एक शिक्षक कामानिमित्त गैरहजर राहिले. त्याच दिवशी उपस्थित राहिलेल्या अनिल बोरकुटे नावाचे शिक्षक दारु पिऊनच शाळेत आले.
मद्यपी शिक्षक शाळेत येताना दारु पिण्यावरच थांबला नाही. त्याने शाळेच्या वेळेत दुपारनंतर देखील पुन्हा दारु पिली. आपल्याला दारु जास्त झाल्याचे समजताच त्याने विद्यार्थ्यांना खेळात मग्न ठेवले आणि स्वतः शाळेशेजारील शेतात जाऊन झोपला. अखेर बऱ्याच वेळापासून बाहेर गेलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान गावातीलच एका व्यक्तीला हे महाशय शेताच्या बांधावर पडून असल्याचे दिसले.
मद्यपी शिक्षकाविरोधात ग्रामस्थांची पोलिसांकडे धाव
शिक्षक दारु पिऊन शेतात झोपल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी शिक्षकाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकत्र जमलेल्या गर्दीच्या कल्लोळानंतरही मद्यपी शिक्षक काही उठेना.
अखेर शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरुन या प्रकरणाची माहिती गोंडपिपरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस तात्काळ भंगारपेठ गावात दाखल झाले. पोलिसांच्या माध्यमातून मद्यपी शिक्षकाला झोपेतून जागवण्यात आले.
मद्यपी शिक्षकाला त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. स्थानिक शाळा समितीच्या तक्रारीनंतर या गंभीर घटनेची नोंद गोंडपिपरी पोलिसांनी घेतली.