इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये नवीन वर्षाचे स्वागत बंडा जोशी यांच्या धमाल व विनोदी हास्यपंचमी एकपात्री प्रयोगाने करण्यात आले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाविद्यालयांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीस सांस्कृतिक उपक्रमाने नविन वर्षाचे स्वागत केले जाते.
बंडा जोशी यांनी विनोदी पद्धतीने मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, कौटुंबिक प्रसंगातील विनोद, युवकांचे, प्रेमीयुगुलांचे विनोदी किस्से, पती-पत्नीतील संवाद, पालक विद्यार्थ्यांमधील संवाद, यासारख्या विषया बरोबरच धमाल विनोदी कविता, हिंदी मराठी गाण्यावर विनोदी साहित्याचा वापर करीत महाविद्यालयातील युवकांची हास्यपंचमी साजरी केली.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘जगणे आनंदी असले पाहिजे. नक्कल दुसऱ्याची न करताना आपणच आपली नक्कल करत आनंदी जीवनाचा उपभोग घेतला पाहिजे’ असे मत व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर, प्रा. सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले. आभार डॉ.शिवाजी वीर यांनी मानले.