माणगाव, रायगड २० नोव्हेंबर २०२३ : माणगाव तालुक्याच्या आणि माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुंबई गोवा महामार्गाला माणगांव आणि इंदापूर शहरातुन बाह्यवळण देण्यात आले आहे. मात्र ह्या बायपासचे काम रखडल्याने ऐन सणासुदीला माणगांव तालुकावासीय नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
येथील मूळ रस्त्याची तरी डागडुजी व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेने या माणगाव तालुक्यातील माणगांव ते लोणेरे लाखपाले दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत दंड थोपाटले असून येत्या ४८ तासात रस्त्याची डागडुजी झाली नाही तर, युवासेनेकडून संबंधित कंपनी व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा असा इशारा युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी पत्रकारांशी माहिती देताना दिला आहे.
खरे पाहता माणगाव काळ नदी पूल ते लोणेरे लाखपाले दरम्यान जुना मुंबई गोवा महामार्गाची खड्ड्यानी चाळण झाली आहे. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ठेकेदार यांच्याकडुन अधुन मधुन खड्डे बुजविण्याची मलमपट्टी सुरू असते. अशी पोकळ कामे करण्यापेक्षा रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष केंद्रित करून वाहन चालक आणि प्रवासी यांच्या हिताकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदार व कंपनीने ठोस उपाययोजना करावी अन्यथा युवासेनेचे ठोक आंदोलन तयार आहे, असा इशारा देखील युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर